राज्यात पुन्हा पावसाचा इशारा

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडू शकतो, तर मुंबई-ठाणे परिसरात हवामान दमट आणि उष्ण राहील.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष, आंबा आणि संत्रा बागांना या पावसाचा मोठा धोका आहे. गारा पडल्यास फळांचे नुकसान होऊ शकते. काढणीला आलेला कांदा आणि सुकवण्यासाठी ठेवलेली कडधान्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यांमुळे गोठ्यांचे नुकसान होऊ शकते, तसेच विजा पडण्याच्या घटनांपासून जनावरांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर प्रदेशापासून ते मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे. तसेच, राजस्थानात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे बाष्प ओढले जात आहे. विदर्भात जमिनीचे तापमान वाढल्याने तिथे उष्णतेची लाट आहे, तर बाष्पामुळे तयार होणाऱ्या ढगांमुळे इतरत्र ‘पाऊस पडत आहे.

अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल होत आहेत. कडक ऊन आणि अचानक येणारा पाऊस यामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. उष्णतेपासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि वादळ सुरू असताना झाडाखाली किंवा विजेच्या खांबापाशी आश्रय घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज असल्याने जुन्या इमारती आणि पत्र्यांच्या शेडपासून लांब राहावे. विदर्भातील उष्णता कमी होण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे निसर्गाचा कोप पाहायला मिळत असल्याने नागरिक आणि प्रशासन दोघांनाही सतर्क राहवे लागणार आहे.






5,983 वेळा पाहिलं