कच्चे तेल महागले

जागतिक ऊर्जा बाजारपेठ सध्या अस्थिरतेच्या गर्तेत सापडली असून कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे. कच्च्या तेलाच्या किमती या एकशे सहा डॉलरच्या पुढे गेले आहेत ही वाढ जवळपास पाच टक्क्यांची असून दोन आठवड्यानंतर तेलाने पुन्हा शंभर डॉलरचा टप्पा पार केला आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने केवळ ऊर्जा क्षेत्रालाच नाही, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा बसला आहे. या दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक, उत्पादन आणि पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे.

तेलाच्या किमती जेव्हा प्रति बॅरल ऐंशी ते नव्वद डॉलर्सच्या पार जातात, तेव्हा त्याचा परिणाम जगातील सर्वच विकसनशील देशांवर होतो. भारतासारख्या देशावर याचा भार पडतो, कारण भारत आपल्या गरजेच्या ऐंशी टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. जागतिक बाजारातील या अस्थिरतेमुळे शेअर बाजार आणि चलनाचे मूल्य यावरही विपरीत परिणाम होत आहेत. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांना वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरांबाबत कडक पावले उचलावी लागत आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची दाट शक्यता असते. इंधन महागले की मालवाहतुकीचा खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होतो. यामुळे महागाईचा आलेख उंचावतो आणि सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. सध्याच्या जागतिक स्थितीमुळे भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असल्याने तेल आयातीसाठी देशाला अधिक परकीय चलन खर्च करावे लागत आहे. केवळ युद्धजन्य परिस्थितीच नाही, तर काही प्रमुख तेलवाहू मार्गांवर निर्माण होणारी असुरक्षितता पुरवठा साखळीत अडथळे निर्माण करत आहे. जर तेल वाहून नेणारी जहाजे सुरक्षितपणे प्रवास करू शकली नाहीत, तर बाजारात तेलाची टंचाई निर्माण होऊन दर आणखी वाढू शकतात. जागतिक ऊर्जा विश्लेषकांच्या मते, जर ही स्थिती कायम राहिली, तर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल शंभर डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ऊर्जा संकटामुळे जगाला आता जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि विद्युत वाहनांचा वापर वाढवण्यावर अनेक देश भर देत आहेत.






7,910 वेळा पाहिलं