
सध्या इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील संघर्षामुळे गेल्या चोवीस तासांत या होर्मुझ सामुद्रधुनीतून एकाही मोठ्या कच्च्या तेलाच्या टँकरने प्रवास केलेला नाही. या तणावाच्या परिस्थितीत भारताची बावीस जहाजे खाडी क्षेत्रात अडकून पडली होती. मात्र, आता भारताच्या दोन महत्त्वाच्या भारतीय एलपीजी वाहक जहाजांना या मार्गातून जाण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला आहे. पाइन गॅस आणि जग वसंत यांना हिरवा कंदील मिळाला आहे.
पाइन गॅस हे जहाज इंडियन ऑइलने, तर जग वसंत हे जहाज बीपीसीएलने भाड्याने घेतले आहे. ही दोन्ही जहाजे सध्या युएईमधील शारजाह जवळ उभी असून ती लवकरच मार्गस्थ होणार आहेत. भारतात घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या जहाजांचे सुखरूप येणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या भारतीय नौदल आणि परराष्ट्र मंत्रालय या संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. भारतीय जहाजांना सुरक्षित कॉरिडॉर मिळावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या संकटकाळात भारताने दाखवलेली संयमी कूटनीती देशाला मोठ्या ऊर्जा संकटापासून वाचवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही जहाजे शारजाहून निघून होर्मुझ सामुद्रधुनी पार करतील, त्यानंतर ओमानच्या आखातातून अरबी समुद्रात प्रवेश करतील आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील बहुधा मुंबई किंवा कांडला बंदरांकडे मार्गस्थ होतील. या जहाजांना हिरवा कंदील मिळाला असून ही जहाजे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत आपला प्रवास सुरू करू शकतात. सामान्यतः खाडी क्षेत्रापासून भारतापर्यंत पोहोचायला पाच ते सात दिवस लागतात.
भारतात दर महिन्याला लाखो टन एलपीजीची गरज असते. या दोन मोठ्या टँकर्समध्ये हजारो टन गॅस असून, त्यांच्या आगमनामुळे देशातील संभाव्य गॅस टंचाई टळू शकते. जर ही जहाजे अडकून पडली असती, तर विम्याच्या रकमेत वाढ होऊन गॅस सिलेंडरच्या किमतीवर परिणाम झाला असता. होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली, तर जगात इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात. भारतासारख्या देशासाठी, जो आपल्या गरजेच्या ऐंशी टक्क्यांहून अधिक तेल आणि गॅस आयात करतो, हा मार्ग बंद होणे म्हणजे आर्थिक संकट ओढवून घेणे असा आहे.