राज्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा
महाराष्ट्र राज्यात मराठी नवीन वर्षाचा अर्थात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. डोंबिवली, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहरांसह राज्याच्या विविध भागात ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघाल्या. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या या शोभायात्रांमध्ये पहायला मिळाल्या. नागरिकांनी यात सहभागी होत आनंद साजरा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील शोभायात्रेत सहभागी होऊन नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, मी सर्वांना नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. नागपूरमध्ये अतिशय चांगली शोभायात्रा आयोजित करण्यात आली. प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहण्यास मिळाला. पारंपारिक वेशभुषेत माता, भगिनी, मुलं पाहण्यास मिळाली. साहसी खेळ सादर केले गेले. दोरीवरचा मल्लखांब करणाऱ्या आपल्या छोट्या बहिणी, ढोल पथकं या सगळ्यांनी हा सोहळा यशस्वी केला आहे. मी सगळ्यांचं कौतुक करतो. हे पाहण्यासाठी मी दरवर्षी या शोभायात्रेत येत असतो. जी गुढी उभारण्यात आली आहे ती विकासाची गुढी आहे. ती अशीच उंच उंच होत राहो या शुभेच्छा मी सर्वांना देतो.
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनीही समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ते या संदेशात म्हणाले आहेत की, गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच नूतन वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो. तसेच युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

गुढीपाडव्यानिमित्त पंढरीच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. . या सजावटीसाठी पिंक डेझी, व्हाइट शेवंती, गुलाब, कामिनी, जिप्सो, जनाडो पत्ता, आर्किड, झेंडू, शेवंती, अस्टर तसेच अशोक पाला यांचा वापर करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली. यावेळी विठूरायाची आणि देवी रुक्मिणीची चंदन उटीने पूजा करण्यात आली. या दर्शन सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील मरीन ड्राईव येथे ड्रोन लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. यात गुढी, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, हापूस आंबा अशा मराठी मातीतील विविध बाबींच्या चित्रकृती दाखवण्यात आल्या. नववर्ष आणि चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त जीवदानी मंदिर परिसर पहाटेपासूनच भक्तगणांनी गजबजून गेला आहे. अगदी पहाटेपासूनच मंदिराच्या परिसरात विविध ठिकाणांहून दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबईतील डोंबिवली येथे तब्बल १५१ फुटांची गुढी उभारण्यात आली. या गुढीमध्ये शंभर पैठणींचा वापर करण्यात आला आहे. डोंबिवलीत विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. यात महिलांनी दुचाकीवरून या शोभायात्रेत सहभाग घेतला. गिरगावातही पारंपारिक वेशभूषेतील तरुण तरुणींनी दांडपट्टा, तलवारबाजी इत्यादी चित्तथरारक प्रर्त्याक्षिके सदर केली. या शोभायात्रांमध्ये परदेशी पर्यटकही सामील झाले होते. यात हस्याजात्रेतील कलाकारांनीही सहभाग नोंदवला.
ठाण्यातील शोभायात्रांविषयी नेहमीच कुतूहल असतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हेही या शोभायात्रेत सामील झाले होते. ढोल ताशांच्या गजरात इथे शोभायात्रा निघाली. येथील महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून बुलेटवरून शोभायात्रा काढली. यावर्षी अनेक अमराठी मंडळीही या शोभायात्रांमध्ये सामील झाली होती.