लोकभवनात इतिहास – अभिलेख दालनाचे उद्घाटन
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक बंकरमध्ये इतिहास व अभिलेख दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनात गेल्या दीडशे वर्षांतील निवडक छायाचित्रे आणि दुर्मिळ दस्तावेजांचा संग्रह करण्यात आला आहे. या वास्तूचा इतिहास अत्यंत रंजक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या जागेला सरकारी घरं म्हणून ओळखले जात असे. सन १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर याचे नाव राजभवन झाले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे राजभवन म्हणून ओळखले जाऊ लागले. विशेष म्हणजे, गेल्याच वर्षी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी या वास्तूचे नाव बदलून लोकभवन असे करण्यात आले आहे. या सर्व स्थित्यंतरांचा इतिहास या नव्या दालनात मांडण्यात आला आहे.
या दालनामध्ये अशा अनेक घटनांची छायाचित्रे आहेत, ज्यांनी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी दिली. यामध्ये प्रामुख्याने १८९८ मधील व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांची भेट आणि १९०५ मधील प्रिन्स ऑफ वेल्स जॉर्ज यांची उपस्थिती, महात्मा गांधी यांनी १९१५ आणि १९३१ सालात या वास्तूला दिलेल्या तीन महत्त्वाच्या भेटींचे दस्तऐवज पाहायला मिळतात. सन १९४७ मध्ये पहिल्या स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम गाण्याचे आदेश देणारे सरकारी परिपत्रक, तसेच १९४९ मधील एक ऐतिहासिक आदेश, ज्यानुसार शासकीय कार्यालयांमधून जॉर्ज सहावे यांचे छायाचित्र काढून तिथे महात्मा गांधींचे छायाचित्र लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गांधीजींच्या निधनानंतर राज्यपालांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना पाठवलेला शोकसंदेश आणि १९५० मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राला पाठवलेले भावपूर्ण पत्रही आपल्याला येथे पाहायला मिळते. सन १९६१ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी आयोजित फॅशन परेड, १९६९ मध्ये चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग यांचे स्वागत आणि २०११ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेला गौरव सोहळा याबद्दलचे दस्तावेज, फोटो उपलब्ध आहेत. हे दालन लोकभवनातील त्याच ब्रिटिशकालीन बंकरमध्ये साकारण्यात आले आहे, जिथे १४ जून २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन झाले होते. जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्या संकल्पनेतून हे दालन साकारले असून, सजावटीची जबाबदारी निधी बोलार यांनी सांभाळली आहे.
राज्यपालांनी या दालनाचे कौतुक करतानाच जास्तीत जास्त ऐतिहासिक दस्तऐवज जनतेसमोर आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता लोकभवनच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून येणाऱ्या अभ्यागतांना आणि पर्यटकांना हे दालन पाहता येणार आहे.