भारतीय पोस्टाच्या महसूलात वाढ

देशातील टपाल सेवा विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महसुलात सोळा टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या कालावधीत विभागाचा एकूण महसूल तब्बल पंधरा हजार दोनशे शह्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचला असून, ही वाढ मागील काही वर्षांतील सर्वाधिक मानली जात आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कामगिरीला ऐतिहासिक असे संबोधले आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०२४-२५ मध्ये इंडिया पोस्टचा महसूल तेरा हजार दोनशे अठरा कोटी रुपये होता. त्याच्या तुलनेत यंदा झालेली सोळा टक्क्यांची वाढ ही विभागाच्या कार्यक्षमतेत आणि सेवा विस्तारात झालेल्या सुधारणांचे प्रतीक मानली जात आहे. या वाढीमागे विविध विभागांचा मोठा वाटा आहे. विशेषतः पार्सल सेवा, मेल सेवा आणि नागरिक-केंद्रित सेवा या क्षेत्रांनी मोठी झेप घेतली आहे. पार्सल सेवेत तब्बल एकोणसत्तर टक्क्यांची वाढ झाली असून, ई-कॉमर्स आणि घरपोच वितरणाच्या वाढत्या मागणीमुळे हा विभाग वेगाने पुढे येत आहे. मेल सेवेत चौतीस टक्के वाढ झाली असून, पारंपरिक टपाल सेवेलाही नवसंजीवनी मिळाल्याचे दिसते.

नागरिक-केंद्रित सेवांनीही सत्तर टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या सेवांमध्ये सरकारी योजना, आधारसंबंधित सेवा, आर्थिक व्यवहार आणि इतर सार्वजनिक सुविधा यांचा समावेश आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात या सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने इंडिया पोस्टची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. आर्थिक सेवांमध्येही चांगली कामगिरी दिसून आली आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेचा महसूल सात हजार सातशे छप्पन कोटी रुपयांवर पोहोचला असून त्यात तेरा टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनांमध्येही सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांची वाढ झाली आहे.  या वाढीसोबतच विभागाने देशभरातील नेटवर्कही विस्तारले आहे. गेल्या काही वर्षांत सुमारे अकरा हजार नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले असून, एकूण जाळे सुमारे एक पूर्णांक पासष्ट लाखांवर पोहोचले आहे. यामुळे ग्रामीण भागात सेवा पोहोच अधिक मजबूत झाली आहे.

आंतरराष्ट्रीय मेल सेवेला काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि मालवाहतूकीतील अडचणींमुळे या विभागात अपेक्षित वाढ झाली नाही. तरीही देशांतर्गत सेवांच्या बळावर एकूण महसूल वाढ टिकून राहिली आहे. भारतीय टपाल सेवेने पुढील काळात मालवाहतूक, पार्सल सेवा आणि डिजिटल सेवा यावर अधिक भर देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच ग्राहक सेवा सुधारणा, कार्यक्षमता वाढ आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.






1,088 वेळा पाहिलं