महिलांच्या सौर तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथील महिला शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रियेच्या क्षेत्रात एक देदिप्यमान यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला बचत गटांच्या गरजांचा प्रामुख्याने विचार करून विकसित करण्यात आलेल्या सौर ऊर्जेवर आधारित फळ व भाजीपाला प्रक्रिया प्रणालीला आता भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे. ‘रुवान फूडटेक-ऑरा ग्रीन’ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्य झाले असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडत आहे. प्रामुख्याने नाशवंत फळे आणि भाजीपाला वाया जाण्याचे प्रमाण यामुळे कमी झाले आहे. सध्याच्या काळात शहरांमध्ये नैसर्गिक आणि रसायनमुक्त अन्नपदार्थांना मोठी मागणी आहे, हीच गरज ओळखून विकसित केलेले हे तंत्रज्ञान ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी महागडी यंत्रणा, कडक नियम आणि विजेची सातत्याने जाणवणारी टंचाई या ग्रामीण भागातील प्रमुख समस्यांवर या प्रणालीने मात केली आहे. संस्थेच्या संस्थापिका विदुला पाटील, हिमाली वर्तक आणि प्रियंका राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ झाला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान संपूर्ण देशातील प्रक्रिया उद्योगाला एक नवी आणि आश्वासक दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हे संपूर्ण यंत्र सौर ऊर्जेवर चालत असल्याने याला विजेची मुळीच आवश्यकता भासत नाही. हे तंत्रज्ञान हाताळण्यास सोपे असून त्याचा देखभाल खर्चही अत्यंत कमी आहे. या प्रक्रियेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात फळे आणि भाजीपाल्यातील नैसर्गिक पोषक घटक, रंग, चव आणि सुगंध जसेच्या तसे टिकून राहतात. विविध पदार्थ केवळ तीन ते बारा तासांत वाळवता येतात. हे उत्पादन पूर्णपणे नैसर्गिक आणि रसायनमुक्त असल्याने ते निर्यातीसाठीही उत्तम दर्जाचे मानले जाते. या प्रणालीचा वापर करून आंबा, फणस, कोकम, द्राक्ष, चिकू, केळी, अंजीर आणि संत्री यांसारखी फळे तसेच विविध पालेभाज्या आणि औषधी वनस्पतींवर प्रक्रिया करता येते. इतकेच नव्हे तर करंदी, सोडे, पापलेट आणि बांगडा यांसारख्या माशांवरही याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. संशोधक निनाद पाटील आणि निमिष राऊत यांच्या मते, या पद्धतीने प्रक्रिया केलेला शेतमाल सुमारे बारा महिन्यांपर्यंत सुरक्षित राहतो आणि ही पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा सुमारे तीनपट अधिक कार्यक्षम आहे.