इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड – दिल्लीमध्ये आपत्कालीन लँडिंग

दिल्लीहून ब्रिटनमधील मँचेस्टरकडे उड्डाण घेतलेल्या इंडिगोच्या एका आंतरराष्ट्रीय विमानामध्ये सोमवारी तांत्रिक बिघाड झाला. या विमानाने इरिट्रियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केला असतानाच विमानात तांत्रिक समस्या उद्भवली. त्यानंतर वैमानिकाने सुरक्षेचा उपाय म्हणून विमान पुन्हा दिल्लीच्या दिशेने वळवले. सुदैवाने, हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

इंडिगोचे सहा – ई एकशे एकतीस हे विमान दिल्लीहून मँचेस्टरसाठी झेपावले होते. विमान जेव्हा आफ्रिकेतील इरिट्रिया देशाच्या हवाई हद्दीत पोहोचले, तेव्हा वैमानिकाच्या लक्षात आले की विमानात काही तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. मँचेस्टरपर्यंतचा उर्वरित प्रवास करणे जोखमीचे ठरू शकले असते, त्यामुळे वैमानिकाने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमान पुन्हा दिल्लीकडे नेण्याचा निर्णय घेतला. विमान दिल्लीत उतरल्यानंतर तांत्रिक बिघाडाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली. या विमानात मोठ्या संख्येने प्रवासी होते. विमान परतल्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली.

प्रवाशांची विमानतळावरच राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली. प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्यासाठी इंडिगोने तात्काळ दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली. इंडिगोने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे, असे स्पष्ट केले आहे. मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल युद्धामुळे सध्या अनेक विमान कंपन्यांनी इराण आणि आसपासच्या हवाई क्षेत्राचा वापर करणे बंद केले आहे. परिणामी, युरोपला जाणारी विमाने आता आफ्रिकेतील इरिट्रिया आणि सुदान मार्गे वळवण्यात आली आहेत. हा मार्ग तुलनेने लांबचा आहे, परंतु युद्धाच्या धोक्यापासून सुरक्षित आहे. याच मार्गावरून जात असताना इंडिगोच्या विमानाला या संकटाचा सामना करावा लागला.

विमानातील हायड्रोलिक सिस्टिम किंवा इंजिनमधील काही तांत्रिक मापदंडांमध्ये तफावत आढळल्याने वैमानिकाने हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या घटनेचा सविस्तर तपास करत असून, विमानाची देखभाल योग्य रीतीने झाली होती का, याचीही चौकशी केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांत भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये असे बिघाड होणे हे चिंतेचे कारण मानले जात आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,026 वेळा पाहिलं