
मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतीय शेती आणि व्यापारावर उमटू लागले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर झाला असून, निर्यातक्षम कृषीमालाचे सुमारे दोनशे हून अधिक कंटेनर न्हावा शेवा बंदरात अडकून पडले आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. इराणने कतार, कुवेत आणि बहरीनवर केलेल्या प्रतिहल्ल्यांनंतर दुबई बंदरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. न्हावा शेवा बंदरातून आखाती देशांकडे जाणारी जहाज सध्या थांबवण्यात आली असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना पुढे जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे जे कंटेनर जहाजावर चढले होते किंवा चढवण्याच्या तयारीत होते, ते आता बंदरातच अडकले आहेत. सध्या नाशिक, अहमदनगर आणि जळगाव या भागांतून द्राक्ष, कांदा आणि केळीची मोठी निर्यात होत असते. प्रामुख्याने नाशिकच्या द्राक्षांचा हंगाम जोरात सुरू असतानाच हे संकट ओढवले आहे. अडकलेल्या दोनशे कंटेनरमध्ये प्रामुख्याने नाशवंत शेतीमालाचा समावेश आहे. हा माल वेळेत पोहोचला नाही, तर तो खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतीय बागायती उत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे निर्यातदारांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर जहाजांचा विमा आणि मालवाहतूक भाडे यामध्ये चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. न्हावा शेवा बंदरात अडकलेल्या मालावर आता बंदर शुल्क आणि देखभालीचा खर्च वाढत चालला आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे निर्यातदार हवालदिल झाले असून, त्यांनी सरकारकडे बंदर शुल्कात सवलत देण्याची मागणी केली आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला, तर आगामी आंबा हंगामावरही याचे सावट येण्याची दाट शक्यता आहे. केवळ निर्यातच नाही, तर आयातीवरही याचा परिणाम झाला आहे. इराणमधून मोठ्या प्रमाणात सुकामेवा आणि मसाल्यांचे पदार्थ भारतात येतात. इराणचे पोर्ट बंद झाल्याने पिस्ता, खजूर आणि शहाजिरे यांसारख्या वस्तूंचे कंटेनर अडकले आहेत. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत या वस्तूंच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असून, ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू लागली आहे.