अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्रायलने ‘एपिक फ्युरी’ आणि ‘लायन्स रोअर’ या मोहिमांतर्गत इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये इराणमधील विविध शहरांतील लष्करी तळ आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले. यात राजधानी तेहरान येथील ईराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांचे निवासस्थान आणि कार्यालयीन परिसरावर भीषण हल्ला झाला. यात खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ईराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या शक्तिशाली हल्ल्यानंतर काही तासांनी त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

आयातोल्ला अली खामेनेई हे शहाऐंशी वर्षांचे होते. या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूची बातमी समजताच ईराणमध्ये शोककळा पसरली आहे. सरकारने देशभरात चाळीस दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला असून, सर्व धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. इतर अरब राष्ट्रांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तेहरान या राजधानीसह प्रमुख शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि दुःखाची भावना असून, अनेक ठिकाणी निदर्शने होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ईराणचा अणुकार्यक्रम आणि त्यांच्या प्रादेशिक हालचालींमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन अमेरिका आणि इस्रायलने ही कठोर कारवाई केल्याचे दोन्ही देशांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईत ईराणमधील अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांना आणि प्रशासकीय इमारतींना लक्ष्य करण्यात आले असून, तिथे मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आयातोल्ला अली खामेनेई यांच्यानंतर ईराणची धुरा कोणाकडे जाणार, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया कधी आणि कशी पार पडेल, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या अनपेक्षित घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे ढग जमा झाले असून, या संघर्षाची तीव्रता वाढल्यास त्याचे परिणाम जागतिक शांततेवर आणि अर्थव्यवस्थेवर व्यापक स्वरूपात होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या लष्करी कारवाईवर प्रतिक्रिया देताना ही मोहीम अत्यंत आवश्यक असल्याचे आणि या कारवाईमुळे भविष्यातील मोठे धोके टाळता येतील असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी खामेनी यांचा उल्लेख जगातला सर्वात क्रूर माणूस असा केला आहे.. मात्र, या घटनेमुळे मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी परिस्थिती अधिकच स्फोटक बनली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जगातील इतर राष्ट्रांनी सर्व बाजूंनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाल्याने तीव्र वाद निर्माण झाला. जगातील अनेक देशांनी हा हिंसाचार थांबवून शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याची मागणी केली आहे. मात्र, दोन्ही बाजूंकडील आक्रमक पवित्रा पाहता परिस्थिती अद्यापही अत्यंत तणावपूर्ण आणि अनिश्चित आहे.

भारताने या संपूर्ण संघर्षावर चिंता व्यक्त केली असून सर्व देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. वादाचे निराकरण सामोपचाराने व्हावे, अशी भूमिका भारताने मांडली आहे. दरम्यान, इराणमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय नागरिकांनी सुरक्षिततेसाठी सरकारकडे मदत मागितली आहे. तिथली परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर असून भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

इराणकडून दुबईवर हल्ले

इराणने आखाती देशांतील अमेरिकेचे मित्रदेश तसेच तेथील अमेरिकन लष्करी तळांवर लक्ष्य साधल्याची माहिती आहे. रात्री इराणने केलेल्या हल्ल्यांत दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि त्याच्या शेजारील ऐतिहासिक बुर्ज अल अरब हॉटेलचे नुकसान झाले आहे. तसेच बुर्ज खलिफा हॉटेलच्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आले आहे. रविवार, १ मार्च २०२६ रोजी पहाटे अमिरातीच्या मीडिया ऑफिसने माहिती दिली की विमानतळावरील घटनेत चार जण जखमी झाले आहेत.

इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी निदर्शने

इराणवर झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांविरोधात जम्मू आणि काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली असून मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली आहेत. श्रीनगर, बारामुल्ला आणि बडगाम यांसारख्या भागांतील शिया समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्यांनी या लष्करी कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. आंदोलकांनी तात्काळ हा हिंसाचार थांबवण्याची मागणी केली आहे. यावेळी महबूबा मुफ्ती आणि मीरवाइज उमर फारूक यांनी इराणवरील आक्रमणाचा निषेध करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. संवाद, शिक्षण आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्न सोडवले जाऊ शकतात, परस्पर आक्रमणामुळे केवळ विनाशच ओढवतो, असे मत त्यांनी आपल्या निवेदनांमधून व्यक्त केले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,730 वेळा पाहिलं