कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक जाहीर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित सर्वसाधारण सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या सोमवारी, १६ मार्च २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता ही महासभा पार पडणार आहे. पालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध झाली असली, तरी महासभेअभावी विविध समित्यांच्या सदस्यांची निवड रखडलेली आहे. आता या सभेच्या निमित्ताने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होणार असून, राजकीय वर्तुळात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
केडीएमसीचे सचिव किशोर शेळके यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, या महासभेत पालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या समित्यांवर नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. यात प्रामुख्याने पालिकेतील आर्थिक निर्णयांचे केंद्र असलेल्या स्थायी समितीसाठी सोळा सदस्यांची निवड केली जाईल. महिला व बालकल्याण समिती, शिक्षण समिती, दिव्यांग कल्याण आणि झोपडपट्टी पुनर्वसन समितीसाठी प्रत्येकी अकरा सदस्यांची नियुक्ती होणार आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी २०२६-२७ मालमत्ता कराचे दर निश्चित करणे आणि शहरातील विकासकामांसाठी निधी मंजूर केला जाईल.
महापौर निवडीनंतर ही महासभा लांबणीवर पडण्यामागे राजकीय कारणे असल्याची चर्चा होती. विशेषतः शिवसेना-उद्धव ठाकरे गटातून निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी अधिकृतपणे गटाची नोंदणी न केल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला होता. मात्र, आता हा पेच सुटल्याचे चिन्हे असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये ‘स्थायी समिती सभापती’ पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. स्थायी समिती सभापती पद मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, दुसरीकडे शिवसेनेनेही आपल्या दाव्यावरून माघार घेतलेली नाही. या महासभेत दोन्ही पक्षांच्या रणनीतीचा कस लागणार आहे.
यावेळी पावसाळ्यापूर्वीची कामे आणि रस्ते दुरुस्तीसाठी या सभेत मोठे आर्थिक निर्णय घेतले जाणार आहेत. नालेसफाई पावसाळ्यापूर्वी व नंतरसाठी चार पूर्णांक तीस कोटींची प्रस्तावित तरतूद आहे. रस्ते देखभाल आणि दुरुस्तीसाठी चौतीस पूर्णांक छत्तीस कोटींची प्रस्तावित तरतूद आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी सहा पूर्णांक सत्तेचाळीस कोटींची प्रस्तावित तरतूद आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि पंचेचाळीस कोटींच्या इतर विकासकामांच्या प्रस्तावांवरही या सभेत चर्चा अपेक्षित आहे. मालमत्ता कराच्या दरात वाढ होणार की नागरिकांना दिलासा मिळणार, याकडे संपूर्ण कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे. सोळा मार्च रोजी होणाऱ्या या सभेमुळे पालिकेच्या रखडलेल्या कारभाराला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, राजकीय समीकरणे पाहता ही सभा वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.