दुबईतील बुर्ज खलिफावर वीज कोसळली

संयुक्त अरब अमिराती आणि विशेषतः दुबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबतच जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर वीज कोसळल्याची थरारक घटना घडली आहे. आठशे अठ्ठावीस मीटर उंच असलेल्या या इमारतीवर विद्युत संरक्षक बसवलेले असल्याने इमारतीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

दुबईत पावसानेही हाहाकार माजवला आहे. वाळवंटी भाग असल्याने दुबईत पावसाचे प्रमाण सहसा कमी असते, मात्र यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या मुख्य रस्त्यांवर, मेट्रो स्टेशनमध्ये आणि मॉलमध्ये पाणी शिरले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर पाणी साचल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली किंवा वळवण्यात आली. प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. शेख झायेद रोड सारख्या मुख्य महामार्गांवर पाणी साचल्याने शेकडो गाड्या अडकून पडल्या आहेत. काही ठिकाणी गाड्या पाण्यावर तरंगतानाही दिसत आहेत. शाळा आणि कार्यालयांना सुट्टी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने शाळांना ऑनलाईन वर्ग भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सक्त इशारा प्रशासनाने दिला आहे.

दुबई आणि आसपासच्या ओमानसारख्या देशांमध्ये होणारा हा पाऊस कृत्रिम पावसामुळे झाला की हा हवामान बदलाचा परिणाम आहे, यावर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, इतक्या कमी वेळात झालेला हा पाऊस दुबईच्या सांडपाणी यंत्रणेसाठी आव्हान ठरला आहे. ओमानमध्ये या पावसामुळे जीवितहानी झाल्याच्याही बातम्या आहेत, त्यामुळे दुबई प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दुबई महानगरपालिका आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथके रस्त्यांवरील पाणी उपसण्यासाठी पंपांचा वापर करत आहेत. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पोलीस आणि स्वयंसेवक रात्रंदिवस काम करत आहेत. वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,748 वेळा पाहिलं