आसाममधील सुखोई अपघातात नागपूरचा सुपुत्र शहीद

देशाच्या सीमेचे रक्षण करताना आसाममध्ये झालेल्या सुखोई – तीस लढाऊ विमानाच्या भीषण अपघातात नागपूरचे सुपुत्र फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद झाले आहेत. ५ मार्च २०२६ रोजी रात्री नियमित सरावादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले. या अपघातात पूर्वेश यांच्यासह स्क्वाड्रन लीडर अनुज वसिष्ठ यांनाही वीरमरण आले. यावर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूर्वेश दुरगकर हे नागपूरच्या न्यू सुभेदार ले-आऊट भागातील रहिवासी होते. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपूरच्या साऊथ पब्लिक स्कूल मध्ये झाले. लहानपणापासूनच त्यांना आकाशात भरारी घेण्याचे आणि देशसेवेचे वेड होते. २०१५ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपूरच्याच डॉ. आंबेडकर कॉलेजमधून संगणक शास्त्रात पदवी मिळवली. मात्र, त्यांचे लक्ष नेहमीच लष्करी सेवेकडे होते. त्यांनी प्रहार डिफेन्स अकॅडमीमध्ये कठोर परिश्रम घेऊन हवाई दलात प्रवेश मिळवला आणि सुखोई सारख्या प्रगत लढाऊ विमानाचे वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

पूर्वेश यांच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापिका मृणाल दस्तुरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, पूर्वेश अत्यंत नम्र आणि अभ्यासात हुशार होते. शाळेच्या हॉल ऑफ फेममध्ये आजही पूर्वेश यांचा सुखोई विमानासोबतचा मोठा फोटो लावलेला आहे. अलीकडेच त्यांना शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, जिथे त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने लढा असा संदेश दिला होता. तोच पाहुणा आज देशाचा शहीद झाल्याने शिक्षकांना अश्रू अनावर झाले आहेत.

पूर्वेश यांचे वडील रवींद्र दुरगकर यांनी अत्यंत अभिमानाने सांगितले की, पूर्वेशने गेल्या वर्षी सीमेपलीकडील दहशतवादी तळांविरुद्ध राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पंधरा दिवस चाललेल्या या अत्यंत गुप्त आणि धोकादायक मोहिमेत तो सहभागी होता, हे घरच्यांनाही माहीत नव्हते. मोहीम यशस्वी करून परतल्यावरच त्याने पालकांना याबद्दल सांगितले होते. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच तो एका घरगुती कार्यक्रमासाठी नागपूरला आला होता, ही त्याची शेवटची भेट ठरली.

गुरुवारी पाच मार्च रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास जोराहट हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचा रडारशी संपर्क तुटला. साठ किलोमीटर अंतरावर कार्बी आंगलोंगच्या घनदाट जंगलात विमानाचा ढिगारा सापडला. हवाई दलाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण, याचा शोध आता घेतला जाणार आहे.

शहीद फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपुरात आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढली जाईल आणि संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. नागपूरचे जिल्हाधिकारी आणि वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
7,398 वेळा पाहिलं