तेहरानमध्ये तेलाचा पाऊस – वातावरण बिघडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट  

मध्यपूर्वेतील धुमसत्या संघर्षात इस्रायलने इराणची राजधानी तेहरान परिसरातील तेलसाठे आणि शुद्धीकरण प्रकल्पांवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे लागलेल्या आगीतून दाट काळा धूर आकाशात पसरला असून, त्यातील तेलकट कण आणि रसायने वातावरणात मिसळल्याने शहरात काळसर पावसाचे थेंब पडू लागले आहेत. स्थानिक नागरिकांनी या भयावह परिस्थितीला तेलाचा पाऊस असे संबोधले असून, अनेक भागांत हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याची नोंद करण्यात आली आहे.

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तेहरान आणि अल्बोर्झ परिसरातील अनेक तेलसाठे व इंधन वितरण केंद्रांना लक्ष्य केले आहे. या स्फोटांमध्ये किमान चार तेलवाहतूक चालकांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या वृत्तसंस्थेने दिली आहे. हवेत विषारी धूर पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास आणि त्वचेची जळजळ जाणवू लागली असून संपूर्ण शहरावर काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य पसरले आहे.

या गंभीर संकटानंतर इराणच्या ‘रेड क्रेसेंट’ या मदत संस्थेने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तेलसाठ्यांच्या आगीमुळे हवेत हायड्रोकार्बन, गंधक आणि नायट्रोजन यांसारखे विषारी घटक मिसळले असून, त्यातून पडणारा पाऊस त्वचा आणि श्वसनसंस्थेसाठी अत्यंत घातक ठरू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक भागांत या दाट धुरामुळे भरदिवसा अंधार दाटून आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, या संघर्षाची झळ आता इतर आखाती देशांनाही बसू लागली आहे. बहरीन या देशाने असा आरोप केला आहे की, इराणच्या एका ड्रोनने त्यांच्या जल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला केला आहे. समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करणाऱ्या या प्रकल्पाचे हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बहरीनमधील नागरी पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यपूर्वेतील या वाढत्या संघर्षामुळे तेल उद्योग, पाणीपुरवठा आणि नागरी पायाभूत सुविधांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. ऊर्जा आणि पाण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवरील हे हल्ले परिस्थिती अधिक हाताबाहेर जात असल्याचे संकेत देत आहेत. या घडामोडींमुळे इराण, इस्रायल, बहरीन आणि इतर शेजारील देशांमध्ये युद्धाचा तणाव कमालीचा वाढला असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
3,535 वेळा पाहिलं