विठ्ठल मंदिरात आता ऑनलाइन पूजा
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी कोट्यवधी वारकरी आणि भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात. भाविकांची ही वाढती संख्या आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीच्या विविध पूजा आणि उपचारांसाठी रांगेत उभे न राहता घरबसल्या ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.
मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दर्शनासाठी आणि पूजेसाठी होणारी गर्दी नियंत्रित करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या अनेक देवस्थानांमध्ये ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे, त्याच धर्तीवर आता पंढरपूरमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे भाविकांचा वेळ वाचणार असून त्यांना आपल्या सोयीनुसार पूजेचा दिवस आणि वेळ निश्चित करता येईल. मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी केल्या जाणाऱ्या मुख्य पूजांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. नित्य पूजा, महापूजा, तुळशी अर्चन, अभिषेक पूजा या पूजांचे ऑनलाईन बुकिंग करता येईल.
भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नोंदणीकरण करावे लागेल. येथे ऑनलाइन सेवा किंवा पूजा बुकिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर भाविकांना उपलब्ध तारखांची माहिती मिळेल. तारीख निवडल्यानंतर भाविकांना आपले नाव, गोत्र आणि इतर माहिती भरून ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर भाविकांना एक ई-पावती मिळेल, जी पूजेच्या दिवशी मंदिरात दाखवणे अनिवार्य असेल. यापूर्वी अनेकदा पूजेच्या बुकिंगसाठी भाविकांना मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागत असे, ज्यामुळे फसवणुकीच्या तक्रारी येत होत्या. आता थेट मंदिर समितीच्या पोर्टलवरून बुकिंग होणार असल्याने प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येईल. तसेच, दक्षिणेचे दर आणि पूजेचे साहित्य यांची स्पष्ट माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. यामुळे परगावाहून येणाऱ्या भाविकांना नियोजनात सोपे जाईल. विठ्ठल मंदिर समितीने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन पूजा बुकिंगमुळे पददर्शन घेणाऱ्या सामान्य भाविकांच्या रांगेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. पूजेच्या वेळा अशा प्रकारे निश्चित केल्या आहेत की, सामान्य दर्शन घेणाऱ्या वारकऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही. उलट, नियोजित पूजेमुळे गोंधळ कमी होईल.