पाकिस्तान जगातील सर्वात प्रदूषित देश

जगभरातील हवेच्या गुणवत्तेचा मागोवा घेणाऱ्या स्विस तंत्रज्ञान कंपनी आयक्यूएअरने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, पाकिस्तान हा २०२५ या वर्षात जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. या अहवालाने दक्षिण आशियातील बिघडलेल्या पर्यावरण स्थितीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला असून मानवी आरोग्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मानवी आरोग्यासाठी सुरक्षित मानली जाणारी सूक्ष्म धूलिकणांची मर्यादा वार्षिक सरासरी पाच मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकी निश्चित केली आहे. मात्र, पाकिस्तानात हे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल तेरा पटीने जास्त असल्याचे आढळले आहे. हे सूक्ष्म धूलिकण इतके लहान असतात की ते श्वासावाटे फुफ्फुसांत शिरून थेट रक्तप्रवाहात मिसळू शकतात, ज्यामुळे हृदयविकार आणि कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवतात.

या अहवालात जगभरातील एकशे त्रेचाळीस देश आणि प्रदेशांमधील हवेचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर बांगलादेश आणि ताजिकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून भारतातील उत्तर प्रदेशमधील लोनी हे दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील सर्वात प्रदूषित पहिल्या पंचवीस शहरांपैकी सर्व शहरे भारत, पाकिस्तान आणि चीनमधील आहेत. अमेरिकेने बजेट कपातीमुळे आपल्या दूतावासांमधील हवा मोजणी यंत्रणा बंद केल्याने आफ्रिकेतील अनेक देशांची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. यामुळे तुर्कमेनिस्तान आणि टोगो यांसारख्या देशांना या वर्षीच्या अहवालातून वगळण्यात आले आहे.

दक्षिण आशियात प्रदूषणाची पातळी वाढण्यासाठी प्रामुख्याने मानवनिर्मित कारणे जबाबदार आहेत. जुन्या वाहनांमधून निघणारा धूर आणि निकृष्ट दर्जाचे इंधन, वीज निर्मितीसाठी कोळशाचा वापर करणे, पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणारा प्रचंड धूर ही यामागची प्रमुख कारणे आहेत. कॅनडा आणि अमेरिकेतील वणव्यांमुळे उत्तर अमेरिकेतील हवेची गुणवत्ताही बिघडली असून त्याचा परिणाम युरोपपर्यंत जाणवला आहे. हवेतील प्रदूषणामुळे जगभरात अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. खराब हवेमुळे मुलांच्या फुफ्फुसांची वाढ खुंटणे, वृद्धांमध्ये दमा आणि श्वसनाचे विकार तीव्र होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. अहवालानुसार, जगातील केवळ चौदा टक्के शहरे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषात बसतात, तर नव्वद टक्क्यांहून अधिक लोक अजूनही असुरक्षित हवेत श्वास घेत आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,397 वेळा पाहिलं