
आसाममधील गुवाहाटी शहरात मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी साचल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आसामच्या मुख्य सचिवांनी प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी चोवीस तास सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराने गेल्या पंच्याहत्तर वर्षांतील एप्रिल महिन्यातील पावसाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
गेल्या चोवीस तासांत झालेल्या तुफानी पावसामुळे गुवाहाटीतील सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. अनिल नगर, नबीन नगर, रुक्मिणी गाव आणि हातिगाव यांसारख्या प्रमुख वसाहतींमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्या पाण्यावर तरंगताना दिसल्या. शहरातील ड्रेनेज यंत्रणा ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या घरातही पाणी शिरले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य सचिव रवी कोटा यांनी वरिष्ठ जिल्हा प्रशासकीय अधिकारी आणि गुवाहाटी महानगरपालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, मदतीसाठी कोणताही विलंब सहन केला जाणार नाही. शहरात चोवीस तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. ज्या भागांत पाणी साचले आहे, तिथून पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी साचलेल्या भागांत विजेचा धक्का लागून अपघात होऊ नये म्हणून वीज विभागाला सतर्क राहण्यास सांगितले आहे.
शहरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. ठिकठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था केली जात आहे. मुख्य सचिवांनी महापालिका आयुक्तांना स्वतः फिल्डवर उतरून कामाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पावसाचा जोर वाढल्यास आवश्यक ते अन्नपदार्थ आणि औषधांचा साठा तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गुवाहाटीमधील भौगोलिक परिस्थिती आणि डोंगराळ भागातून येणारे पाणी यामुळे दरवर्षी फ्लॅश फ्लडचा धोका निर्माण होतो. मात्र, यंदा पावसाचा जोर इतका प्रचंड होता की प्रशासकीय यंत्रणाही काही काळ हतबल झाली होती. मुख्य सचिवांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ड्रेनेज मास्टर प्लॅनवर काम करण्याचे संकेत दिले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे नाल्यांची तोंडे बंद झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे प्राथमिक निरीक्षणात समोर आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन कामरूप जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे.
प्रशासनाने गुवाहाटीतील नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सखल भागातील रहिवाशांनी मौल्यवान वस्तू उंच ठिकाणी हलवाव्यात, आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. गुवाहाटी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन सध्या युद्धपातळीवर काम करत असून, शहर पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.