राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा पस्तीस अंशांच्या पुढे गेला आहे. तर विदर्भातील काही शहरांत तो चाळीस अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मात्र, एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच दुसरीकडे अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तापमान वाढत असतानाच हवामान विभागाने आज आणि उद्या राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट माथ्यावर आणि काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या काही हवामान प्रणालींमुळे वाऱ्यांच्या दिशेत बदल झाला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. जेव्हा कमाल तापमान वाढते आणि हवेत आर्द्रता असते, तेव्हा स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पावसाची शक्यता निर्माण होते.
दुसरीकडे विदर्भातील अकोला येथे तापमानाने उच्चांक गाठला असून तिथे पारा एकोणचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पूर्णपणे ओसरल्यामुळे आणि कोरड्या हवामानामुळे विदर्भातील उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहून तापमानात आणखी एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरातही तापमानाने पस्तिशी ओलांडली आहे. शिवाजीनगर केंद्रावर सलग दोन दिवस पस्तीस अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीच्या तापमानातही किंचित वाढ झाल्याने पुणेकरांना दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा जाणवू लागला आहे. लोहगाव आणि पाषाण सारख्या उपनगरांमध्ये तर तापमान छत्तीस – सदतीस अंशांपर्यंत गेले आहे. वाढत्या उन्हामुळे आणि बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.