आखाती देशांतील संघर्षांमुळे युएईमध्ये शाळा – विद्यापीठांना सुट्ट्या जाहीर

संयुक्त अरब अमिराती सरकारने देशभरातील सर्व शाळा तसेच विद्यापीठांसाठी मध्यवर्ती सुट्टी नियोजित वेळेच्या एक आठवडा आधीच जाहीर केली आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे उद्भवलेली सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन, हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. युएईच्या शिक्षण मंत्रालय आणि उच्च शिक्षण मंत्रालयाने या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे.

नव्या निर्णयानुसार, सुट्ट्यांची सुरुवात सोमवारी ९ मार्च २०२६ पासून, रविवारी २२ मार्च २०२६ पर्यंत असेल. ही सुट्टी दोन आठवडे असेल. सर्व वर्ग आणि कार्यालयीन कामकाज सोमवारी २३ मार्च २०२६ पासून पुन्हा सुरू होईल. हा निर्णय सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. हा निर्णय अचानक घेण्यामागे इराणचे आक्रमण आणि या क्षेत्रातील वाढता तणाव हे असल्याचे मानले जात आहे. युएईच्या हवाई क्षेत्रात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला झाल्याच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या निर्णयापूर्वी सरकारने दोन मार्च ते सहा मार्च या कालावधीत सर्व शाळांना ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने आता थेट सुट्ट्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या शाळांमध्ये सीबीएसई किंवा आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांच्या वेळापत्रकावर याचा काय परिणाम होईल, याबाबत शाळांकडून स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण देणे हा आहे. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात त्यांना घरातच ठेवणे अधिक सुरक्षित आहे, असे राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते डॉ. सैफ अल धहेरी यांनी स्पष्ट केले.

याचदरम्यान युएईमध्ये ईदच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जास्त दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. मात्र, पर्यटनासाठी बाहेर पडण्यापूर्वी किंवा आपल्या मायदेशी परतण्यापूर्वी नागरिकांनी प्रवासासंबंधीच्या सरकारी मार्गदर्शक सूचना तपासून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युएई सरकारने घेतलेला हा निर्णय सुरक्षा प्रथम या धोरणाचा भाग आहे. पश्चिम आशियातील तणाव जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये गर्दी टाळण्यासाठी हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. यासोबतच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी चॅनेलवरून मिळणाऱ्या माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,585 वेळा पाहिलं