श्रीलंकेकडून इराणच्या नौसैनिकांचे पार्थिव दूतावासाकडे सुपूर्द

श्रीलंका सरकारने इराणच्या नौदलातील मृत्यूमुखी पडलेल्या पंचेचाळीस नौसैनिकांचे पार्थिव इराणच्या दूतावासाकडे सुपूर्द केले आहे. हे सर्व नौसैनिक इराणच्या आयआरआयएस डेना या युद्धनौकेवर कार्यरत होते. श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ समुद्रात झालेल्या भीषण हल्ल्यानंतर ही युद्धनौकेला जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर श्रीलंका नौदलाने सलग शोधमोहीम राबवून हे मृतदेह समुद्राबाहेर काढले.

ही घटना श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळील गॉल परिसरात घडली. इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका भारतात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन इराणकडे परतत होती. त्यावेळी अमेरिकेच्या पाणबुडीने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ही युद्धनौका समुद्रात बुडाली, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे सागरी क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

या भीषण दुर्घटनेनंतर श्रीलंका नौदल आणि इतर बचाव पथकांनी तातडीने शोध व बचाव कार्य हाती घेतले होते. समुद्राच्या अथांग पाण्यातून अनेक नौसैनिकांचे पार्थिव बाहेर काढण्यात आले आणि ते गॉल येथील रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, हे मृतदेह इराणच्या दूतावासाकडे सोपवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

श्रीलंकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सुपूर्द केलेले हे पार्थिव विशेष विमानाने इराणमध्ये पाठवण्यात येणार आहेत, जेणेकरून मृत नौसैनिकांवर त्यांच्या मायदेशात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करता येतील. या संपूर्ण प्रक्रियेसाठी श्रीलंका सरकार, इराणचा दूतावास आणि संबंधित प्रशासन यांच्यात सातत्याने समन्वय साधला जात असून सुरक्षिततेची कडेकोट अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे जागतिक राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. इराणने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून सागरी सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंका सरकारने मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून मदत कार्य आणि पार्थिव परत पाठवण्याची प्रक्रिया प्राधान्याने सुरू ठेवली असल्याचे स्पष्ट केले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,807 वेळा पाहिलं