लेहमध्ये जगातील उंच रेल्वे मार्ग

भारतीय रेल्वेने सर्वात जास्त उंचीवरील रेल्वे प्रकल्पाला सुरुवात केली आहे. हिमाचल प्रदेश आणि लडाखला जोडणारा बिलासपूर-मनाली-लेह हा रेल्वे मार्ग आता जगातील सर्वात उंच रेल्वे मार्ग ठरणार आहे. दुर्गम डोंगरदऱ्या, उणे तापमान आणि तांत्रिक आव्हानांना मागे टाकत भारतीय इंजिनिअर्स लेहपर्यंत रेल्वे पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा प्रकल्प केवळ पर्यटनासाठीच नाही, तर भारताच्या सामरिक आणि लष्करी दृष्टीनेही मैलाचा दगड ठरेल.

या रेल्वे मार्गाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार तीनशे एकोणसाठी मीटर उंचीवर बांधले जाणारे रेल्वे स्थानक. हे स्थानक जगात सर्वात उंच ठिकाणी वसलेले असेल. सध्या हा मान चीनमधील तांगगुला स्थानकाकडे आहे, परंतु भारताचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर रेल्वे इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला जाईल. एवढ्या उंचीवर हवेचा दाब कमी असल्याने प्रवाशांसाठी विशेष ऑक्सिजन सुविधा आणि हवामान नियंत्रण प्रणाली बसवण्यात येणार आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण मार्ग डोंगरांच्या आतून आणि खोल दऱ्यांच्या वरून जाणार आहे. या चारशे अठ्ठ्याण्णव किमी लांबीच्या मार्गातील निम्म्याहून अधिक प्रवास हा बोगद्यातून असेल. काही बोगदे हे चक्क सत्तावीस किमीहून अधिक लांब असतील. खोल दऱ्या आणि खळाळणाऱ्या नद्या ओलांडण्यासाठी अनेक उंच पूल बांधले जाणार आहेत. हे पूल अतिशय वेगाने वाहणारे वारे आणि भूकंपाचे धक्के सहन करू शकतील अशा तंत्रज्ञानाने बनवले जातील. हा मार्ग हिमाचलमधील बिलासपूरपासून सुरू होऊन मनाली, कीलांग मार्गे लेहपर्यंत पोहोचेल. हिवाळ्याच्या दिवसांत बर्फवृष्टीमुळे लेह आणि लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटतो. रस्ते मार्ग बंद झाल्याने रसद पुरवठा करणे कठीण होते. मात्र, हा रेल्वे मार्ग बाराही महिने सुरू राहणार असल्याने लडाखमधील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ताजी फळे, भाज्या व औषधे वेळेवर पोहोचू शकतील.

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या या भागासाठी रेल्वे मार्ग असणे लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा सीमेवर सैन्य तैनात करायचे असल्यास, रेल्वेच्या माध्यमातून जड रणगाडे, दारूगोळा आणि रसद अत्यंत कमी वेळात पोहोचवता येईल. सध्या लष्कराला रस्ते किंवा हवाई मार्गावर अवलंबून राहावे लागते, जे खर्चीक आणि हवामानावर अवलंबून असते. हिमालयीन रेल्वेचा प्रवास हा पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. बर्फाच्छादित शिखरे, निळे आकाश आणि खोल दऱ्यांमधून जाणारी ही रेल्वे प्रवाशांना खिळवून ठेवेल. यामुळे लडाखमधील पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील.






24,167 वेळा पाहिलं