मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी

मराठी टेलिव्हिजनवर सध्या कौटुंबिक विषयांसोबतच ग्लॅमरस आणि वेगळ्या धाटणीच्या कथांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. याच प्रवासात कलर्स मराठी वाहिनीवर २३ मार्च २०२६ पासून एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मोहिनी’ असे नाव असलेली ही मालिका तिच्या घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे याचे मराठी मालिका विश्वात झालेले पुनरागमन. हिंदीतील गाजलेल्या ‘मधुबाला’ मालिकेचा रिमेक मानल्या जाणाऱ्या या मालिकेतून चित्रपटसृष्टीतील झगमगाट आणि त्यामागील संघर्षाची एक अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.

मालिकेची कथा मनोरंजन विश्वातील प्रसिद्धी आणि त्यामागील वास्तव यांच्याभोवती विणलेली आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वाभिमानी मुलगी ‘मोहिनी’ आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार आर.के. म्हणजे ऋषभ कुंद्रा हे या कथेचे केंद्रस्थान आहेत. अनघा ठाकूर हिने मोहिनीची भूमिका साकारली असून समीर परांजपे आर.केच्या भूमिकेत एका शक्तिशाली आणि काहीशा अहंकारी सुपरस्टारच्या रूपात समोर आला आहे. सुपरस्टारचा प्रचंड इगो आणि एका साध्या मुलीचा ठाम स्वाभिमान जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा निर्माण होणारा ठिणगी कथानकाची रंजकता वाढवणारी ठरत आहे.

कोणत्याही मालिकेचा संघर्ष तेव्हाच फुलतो जेव्हा त्यातील पात्रांची मांडणी प्रबळ असते. या मालिकेतही सुरुवातीला आर.केच्या एन्ट्रीने संपूर्ण सेटवर निर्माण होणारा दरारा आणि त्याच्या समोर चुकून आलेली मोहिनी यांच्यातील धडक ही कथानकाची पहिली पायरी आहे. एका बाजूला पडद्यावरचा सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला पडद्यामागे काम करणारी मोहिनी यांच्यातील सामाजिक आणि वैचारिक दरी मालिकेला एक वेगळीच खोली प्राप्त करून देते. प्रसिद्धीच्या झगमगाटात माणुसकी आणि मेहनत किती महत्त्वाची असते, हा संदेश या संघर्षातून प्रभावीपणे मांडला जाणार आहे.

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, समीर परांजपेने त्याच्याआर.केच्या भूमिकेत एक वेगळीच जरब भरली आहे. त्याचा लूक आणि वावर एका खऱ्या सुपरस्टारला साजेसा आहे. तर अनघा ठाकूरने मोहिनीच्या भूमिकेतून एक सामान्य पण जिद्दी मुलगी अत्यंत नैसर्गिकपणे साकारली आहे. निर्मात्यांच्या मते, ही मालिका केवळ एक प्रेमकहाणी नसून, मनोरंजन विश्वातील पडद्यामागील भावविश्व आणि तेथील कलाकारांचा वैयक्तिक लढा दाखवणारी एक महत्त्वाकांक्षी कलाकृती आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून ही मालिका उत्तम दर्जाची असून यातील सिनेमॅटोग्राफी आणि चकाचक सेट्स प्रेक्षकांना चंदेरी दुनियेचा अनुभव देतात.

थोडक्यात सांगायचे तर ‘मोहिनी’ ही मालिका केवळ मनोरंजन करणारी नसून ती स्वाभिमान आणि प्रेमाची नवी व्याख्या मांडणारी आहे. अहंकाराला प्रेमाने आणि स्वाभिमानाने कसे जिंकता येते हा विचार या मालिकेतून मांडला आहे. समीर परांजपेच्या कमबॅकमुळे आणि मालिकेच्या वेगळ्या विषयामुळे कलर्स मराठीवरील ही नवी मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,143 वेळा पाहिलं