पंतप्रधानांकडून तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणिसाव्या रोजगार मेळाव्यात एकावन्न हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण केले. देशभरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देशात सत्तेचाळीस ठिकाणी हे मेळावे आयोजित करण्यात आले होते. दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे आयोजित या कार्यक्रमात त्यांनी नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना संबोधित करताना सरकारी नोकरी ही केवळ रोजगाराची संधी नसून नागरिकांचे जीवन सुलभ आणि सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की देशाने आपल्या कर्मयोगींवर विश्वास व्यक्त केला असून आता त्या विश्वासाला प्रामाणिकपणा, कर्तव्यभावना आणि आचरणातून अधिक बळ देण्याची जबाबदारी नव्या कर्मचाऱ्यांवर आहे. विकसित भारताच्या दिशेने देश वेगाने पुढे जात असून त्या उद्दिष्टासाठी तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत आज जगातील विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार म्हणून उदयास येत असल्याने विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या रोजगार मेळाव्याचे आयोजन देशातील सत्तेचाळीस ठिकाणी करण्यात आले होते. विविध राज्यांमधून निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे मंत्रालय, गृहमंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग यांसह अनेक केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. सरकारने रोजगार भरती प्रक्रियेला अभियान स्वरूप देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असून आतापर्यंत अठरा रोजगार मेळाव्यांतून सुमारे बारा लाख नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या अलीकडील परदेश दौऱ्यांचाही उल्लेख करत विविध देशांशी झालेल्या करारांमुळे भारतीय तरुणांसाठी नवीन रोजगार आणि तंत्रज्ञानाच्या संधी निर्माण होतील असे सांगितले. नेदरलँड्ससोबत अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर), पाणी व्यवस्थापन आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात, स्वीडनसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि संगणकीय (डिजिटल) नवोन्मेष क्षेत्रात, तसेच संयुक्त अरब अमिराती आणि इटलीसोबत ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व करारांचा थेट लाभ भारतीय युवकांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन नियुक्त उमेदवारांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ या ऑनलाईन प्रशिक्षण मंचाचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. या माध्यमातून त्यांना आपल्या जबाबदाऱ्यांची अधिक चांगली समज होईल आणि प्रशासन अधिक परिणामकारकपणे हाताळता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाच्या प्रगतीमध्ये नव्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल आणि विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत त्यांची भूमिका निर्णायक असेल, असे सांगून त्यांनी सर्व नव्याने नियुक्त झालेल्या युवकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,185 वेळा पाहिलं