शिवालिक गॅसवाहू जहाज सुखरूप दाखल

आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे अत्यंत संवेदनशील बनलेली होर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारताचे शिवालिक हे एलपीजी गॅसवाहू जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप दाखल झाले आहे. शिवालिक या जहाजाच्या सुरक्षित आगमनानंतर, आता नंदा देवी हे दुसरे महत्त्वाचे एलपीजी गॅस जहाज आज गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील कंडला बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध लादले होते किंवा तिथे कडक पाळत ठेवली होती. ही सामुद्रधुनी जागतिक इंधन पुरवठ्यासाठी लाईफलाईन मानली जाते. भारताचे शिवालिक हे जहाज इंधनाचा मोठा साठा घेऊन याच मार्गावरून येणार होता, मात्र युद्धाच्या धोक्यामुळे तो तिथे अडकून पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात वेगाने हालचाली केल्या. इराण सरकारशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर, इराणने भारताच्या दोन एलपीजी गॅसवाहू जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याची विशेष परवानगी दिली. शिवालिक हे जहाज शेहेचाळीस टन एलपीजी गॅस घेऊन सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंद्रा बंदरात सुखरूप पोहोचले. या जहाजाच्या आगमनामुळे देशांतर्गत एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर असलेला ताण कमी होणार आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा वाढत्या मागणीच्या काळात इंधनाचा हा साठा अत्यंत मोलाचा ठरणार आहे. तर नंदा देवी हे जहाज सुमारे शेहेचाळीस हजार सातशे टन एलपीजी गॅस साठा घेऊन मंगळवारी कंडला बंदरात पोहोचेल. नंदा देवीसोबतच जग लाडकी हे एक्याऐंशी हजार टन कच्चे तेल वाहून नेणारे जहाजही युएईहून भारताकडे सुरक्षितपणे येत आहे.

मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन जहाजांमधून एकूण ब्याण्णव हजार सातशे मेट्रिक टन एलपीजी भारतात येत आहे. मुंद्रा बंदरात शिवालिकमधील वीस हजार टन गॅस उतरवला जाणार असून उर्वरित सहव्वीस हजार टन साठा मंगळुरू बंदराकडे रवाना केला जाईल. नंदा देवीच्या आगमनामुळे देशांतर्गत स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. कंडला बंदरावर नंदा देवीच्या आगमनासाठी कागदपत्रांची पूर्तता आधीच करून ठेवण्यात आली आहे, जेणेकरून गॅस उतरवण्याच्या कामात कोणताही विलंब होणार नाही.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,492 वेळा पाहिलं