आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विस्कळीत झाल्याने आंबा निर्यातीवर परिणाम
इराण-इस्रायल संघर्षाचा थेट परिणाम आंबा निर्यातीवर झाली आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांनी घट होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. यामुळे यंदा हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहण्याची शक्यता आहे.
आखाती देश हे भारतीय हापूस आंब्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहेत. मात्र, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विस्कळीत झाली आहे. हवाई मार्गाने होणारी वाहतूक महागल्याने निर्यातीचा खर्च वाढला आहे. पर्शियन आखातातील तणावामुळे जहाजांच्या मार्गात बदल करावा लागत असून, माल पोहोचण्यास विलंब होत आहे. जर हे युद्ध दीर्घकाळ चालले, तर ऐन हंगामात मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये हापूसची निर्यात ठप्प होऊ शकते. याचा परिणाम म्हणून स्थानिक बाजारपेठेत आवक वाढून दर कोसळण्याची भीतीही बागायतदारांना सतावत आहे.
रत्नागिरी, देवगड आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात यंदा हापूसच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस आणि त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आलेली उष्णतेची लाट यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला. तसेच, यंदा तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हवामानातील बदलांमुळे कीड नियंत्रणात येण्याऐवजी वाढत गेली, ज्यामुळे फळधारणेवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक बागायतदारांच्या मते, बागांमध्ये केवळ पन्नास ते साठ टक्केच फळे शिल्लक राहिली आहेत.
नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या हापूसची आवक सुरू झाली आहे, मात्र ती गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. सध्या बाजारपेठेत चार ते पाच डझनच्या एका पेटीला तीन हजार पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ज्या प्रमाणात पेट्या दाखल होतात, त्या तुलनेत यंदा केवळ वीस ते तीस टक्केच माल येत आहे. वाशी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या मते, २५ मार्चनंतर आवक वाढण्याची शक्यता आहे, पण त्यावेळची जागतिक स्थिती निर्यातीसाठी अनुकूल असणे आवश्यक आहे. उत्पादन घटल्यामुळे आणि खते-कीटकनाशकांच्या किमती वाढल्यामुळे बागायतदारांचा उत्पादन खर्च वधारला आहे. त्यातच निर्यातीची शाश्वती नसल्याने मोठ्या बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. आम्ही वर्षभर बागेची निगा राखतो, पण ऐन हंगामात नैसर्गिक आणि जागतिक संकटं आल्यामुळे आमचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे, अशी भावना एका स्थानिक बागायतदाराने व्यक्त केली.