मेट्रो तीनमधील नेटवर्क ठप्प
मुंबईची पहिली भुयारी मेट्रो असलेली मेट्रो तीनमधून प्रवास करताना प्रवाशांना तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या संपूर्ण तेहत्तीस किलोमीटरच्या भुयारी मार्गावरील मोबाईल नेटवर्क सेवा खंडित करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मोबाईल नेटवर्क नसल्याचा फटका बसत आहे.
मुंबई मेट्रो तीनच्या संपूर्ण भुयारी मार्गावर आणि स्थानकांवर मोबाईल नेटवर्कची सुविधा देण्यासाठी सौदी अरेबियास्थित एसीईएस इंडिया या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, करारातील काही अटींची पूर्तता न झाल्यामुळे आणि तांत्रिक बाबींवरून एमएमआरसी आणि संबंधित कंपनीमध्ये मतभेद निर्माण झाले. अखेर, एमएमआरसीने या कंपनीसोबतचा दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीचा करार रद्द करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. याचा थेट परिणाम म्हणून कंपनीने आपली यंत्रणा बंद केल्याने प्रवाशांचे मोबाईल नेटवर्क गायब झाले आहे.
मेट्रो तीनचा मार्ग पूर्णपणे भुयारी असल्याने जमिनीच्या खाली मोबाईल सिग्नल मिळत नाहीत. आरे ते बीकेसी आणि पुढे वरळीपर्यंतच्या टप्प्यात प्रवाशांना महाजाल आणि संपर्क साधण्याची सुविधा मिळत होती, ती आता पूर्णपणे बंद झाली आहे. कार्यालयातून घरी जाताना किंवा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर असताना मेट्रोमध्ये गेल्यावर संपर्क तुटतो. तातडीचा फोन करायचा असेल किंवा ऑनलाइन पैसे पाठवायचे असतील, तरी नेटवर्क नसल्याने अडचणी येतात, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली आहे. विशेषतः डिजिटल इंडियाच्या युगात तिकीट काढण्यासाठी किंवा यूपीआय वापरण्यासाठी नेटवर्क नसल्याने गोंधळ उडत आहे.
करार रद्द झाल्यामुळे आता नवीन कंपनीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया एमएमआरसीला राबवावी लागणार आहे. नवीन कंत्राटदार नियुक्त करून संपूर्ण तेहत्तीस किलोमीटर मार्गावर पुन्हा एकदा नेटवर्क टॉवर्स आणि बूस्टर्स बसवणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. मेट्रोच्या भुयारी मार्गात काम करण्यासाठी केवळ रात्रीचा काही तासांचा वेळ मिळतो, त्यामुळे ही सेवा पुन्हा पूर्ववत होण्यासाठी किमान काही महिने लागू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना एमएमआरसीने प्रवाशांना आश्वस्त केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली आपत्कालीन संवाद यंत्रणा आणि स्थानकांवरील अंतर्गत टेलिफोन सेवा पूर्णपणे कार्यरत आहे. केवळ व्यावसायिक मोबाईल नेटवर्कवर याचा परिणाम झाला असून, प्रवाशांनी घाबरून जाऊ नये. नवीन सेवा प्रदाता नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.