रेल्वे तिकीट परताव्याचे नवे नियम

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट आरक्षणातील काळाबाजार रोखण्यासाठी तिकीट परतावा आणि रद्द करण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी या नव्या सुधारणांची घोषणा केली. हे नवे नियम १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान टप्प्याटप्प्याने सर्व गाड्यांसाठी लागू केले जाणार आहेत.

नव्या नियमांनुसार, तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्याचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट रद्द केले तरच परतावा मिळेल. यापूर्वी हा कालावधी चार तासांचा होता. जर तुम्ही गाडी सुटण्याच्या बाहत्तर तास म्हणजे तीन दिवस आधी तिकीट रद्द केले, तर केवळ किमान तिकीट रद्दीकरण शुल्क कापून पूर्ण परतावा मिळेल. पूर्वी ही मुदत अठ्ठेचाळीस तासांची होती. गाडी सुटण्याच्या बाहत्तर ते चोवीस तास आधी तिकीट रद्द केल्यास एकूण भाड्याच्या पंचवीस टक्के रक्कम कापली जाईल. जर तिकीट चोवीस ते आठ तास आधी रद्द केले, तर पन्नास टक्के रक्कम कापली जाईल. पूर्वी हा नियम बारा ते चार तासांसाठी होता. गाडी सुटण्याच्या आठ तास आधी किंवा त्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला एकही रुपया परतावा मिळणार नाही.

रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, अनेक एजंट आणि दलाल शेवटच्या क्षणी तिकिटे अडवून ठेवतात आणि प्रवाशांना ती चढ्या दराने विकतात. जर तिकीट विकले गेले नाही, तर चार तास आधी ते रद्द करून पन्नास टक्के परतावा मिळवत असत. आता हा कालावधी आठ तास केल्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल. या मोहिमेअंतर्गत रेल्वेने आतापर्यंत तीन कोटींहून अधिक संशयास्पद युजर आयडी बंद केले आहेत. प्रवाशांना दिलासा देणारा दुसरा निर्णय म्हणजे प्रवास सुरू करण्याचे ठिकाण आता बदलता येणार आहे. आता प्रवासी गाडी सुटण्याच्या तीस मिनिटे आधीपर्यंत जिथून गाडी पकडणार आहात ते ठिकाण डिजिटल पद्धतीने बदलू शकतील. यापूर्वी हा बदल केवळ आरक्षण तक्ता तयार होण्यापूर्वीच करता येत असे, जो साधारणपणे चार ते आठ तास आधी तयार होतो.

आता काऊंटरवरून घेतलेले तिकीट देशभरातील कोणत्याही रेल्वे काऊंटरवर रद्द करता येईल. यापूर्वी ज्या स्थानकावरून प्रवास सुरू होणार होता किंवा जिथे संपणार होता, तिथेच रद्द करण्याची अट होती. ई-तिकिटांसाठी टीडीआर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून, काही तांत्रिक कारणास्तव ट्रेन रद्द झाल्यास परतावा आपोआप जमा होईल. काऊंटर तिकीटधारक प्रवाशांना गाडी सुटण्याच्या तीस मिनिटे आधीपर्यंत आपली प्रवासाची श्रेणी बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. हे नियम नवीन नसल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत-दोन या गाड्यांसाठी हेच नियम प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक परिणाम पाहता, आता १ एप्रिलपासून सर्व मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना हे नियम लागू होतील.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,289 वेळा पाहिलं