पिक्चर बॉईज – छोटा पुढारी आता मोठ्या पडद्यावरचा हिरो

महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते ‘बिग बॉस’च्या घरापर्यंत आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ‘छोटा पुढारी’ म्हणजेच घनश्याम दरोडे आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घनश्याम दरोडे आता केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता चक्क चित्रपटाचा नायक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याच्या आगामी ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

घनश्याम दरोडे याने आपल्या लहान वयात राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेतून सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळवली होती. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामध्ये त्याने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आणि तिथेही त्याने आपल्या चपखल उत्तरांनी आणि स्वभावाने घराघरात ओळख निर्माण केली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घनश्याम नक्की काय करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘पिक्चर बॉईज’ हा चित्रपट येत्या १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रदर्शित होणारा हा चित्रपट तरुणाई आणि विशेषतः ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या चित्रपटाचे कथानक नेमके काय असेल याबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आली नसली तरी नावावरून हा चित्रपट चित्रपटसृष्टीशी संबंधित किंवा तरुणांच्या स्वप्नांवर आधारित असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. घनश्यामने यापूर्वी आपल्या भाषणांमधून लोकांचे मनोरंजन केले आहेच पण आता तो अभिनयाच्या कसोटीवर किती उतरतो. हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

घनश्याम दरोडे याने आपल्या या नव्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. बिग बॉसनंतर मिळालेली ही मोठी संधी त्याच्या करिअरला एक नवीन वळण देणारी ठरू शकते. सोशल मीडिया स्टार ते चित्रपटाचा नायक हा घनश्यामचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या या नवीन भूमिकेसाठी त्याला सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी सध्या जोरात सुरू असून, लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

निखळ मनोरंजन आणि घनश्यामची खास गावरान शैली या चित्रपटात पाहायला मिळेल, अशी आशा प्रेक्षकांना आहे. ग्रामीण भागातील एका मुलाने आपल्या जिद्दीच्या जोरावर सिनेसृष्टीपर्यंत मारलेली ही मजल कौतुकास्पद आहे. १५ मे रोजी चित्रपटगृहात ‘छोटा पुढारी’ काय धमाका करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्याप्रमाणे त्याच्या भाषणांना सोशल मीडियावर लाखांच्या घरात पसंती मिळते, तशीच पसंती त्याच्या या पहिल्या चित्रपटालाही मिळेल का? हे लवकरच स्पष्ट होईल.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,900 वेळा पाहिलं