सिंधुदुर्ग जिल्हा घरगणनेत प्रथम
राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डीजिटल माध्यमातून शंभर टक्के जनगणना करणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जिल्ह्याने हा बहुमान मिळवला आहे. यासोबतच या जिल्ह्याने राज्याच्या इतर भागांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शन
याची अंमलबजावणी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट देखरेखीखाली करण्यात आली. सोळा मे ते चौदा जून या नियोजित कालावधीपूर्वीच जिल्ह्याने हे उद्दिष्ट साध्य केले आहे. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी महसूल विभागातील सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला विश्वासात घेऊन गावोगावी जनजागृती केली. त्यामुळे नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती पुरवली. यामुळे घर यादीचे काम अत्यंत वेगाने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होऊ शकले.
वेंगुर्ला तालुक्यातील मुठ गावाचा आदर्श
या मोहिमेमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील मुठ गावाने सुरुवातीलाच आदर्श घालून दिला होता. मुठ गाव छत्तीस घर आणि एकशे चव्वेचाळीस लोकसंख्या असलेले आहे. या गावातील सर्व पंचेचाळीस कुटुंबांनी डिजिटल माध्यमातून स्वतःहून आपली माहिती भरली. यामुळे शंभर टक्के स्वगणना पूर्ण झाली होती. हे गाव राज्यात स्वयं-गणना पूर्ण करणारे पहिले गाव ठरले होते. याच यशस्वी पॅटर्नचा प्रेरणा घेऊन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याने आता आपल्या सर्व तालुक्यांमध्ये ही मोहीम शंभर टक्के फत्ते केली आहे.
डिजिटल पद्धती आणि गोपनीयता
भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल राबवली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान प्रगणकांनी घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन इमारत क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, उपलब्ध सुविधा आणि मालमत्ता यांसारख्या एकूण तेहतीस वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती संकलित केली आहे. नागरिकांनी दिलेली ही सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाणार आहे. ही बाब मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
विक्रमी कामगिरीबद्दल कौतुक
राज्यासाठी सिंधुदुर्ग ठरला मार्गदर्शक या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी कौतुक केले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांनीही सिंधुदुर्गच्या या गतिमान आणि समन्वयित मॉडेलचा अभ्यास करून आपापल्या क्षेत्रातील घरगणना तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महसूल विभागाचे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि सर्व तलाठ्यांच्या अहोरात्र परिश्रमांमुळे सिंधुदुर्गने राज्याच्या नकाशावर जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.